मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई-ठाण्यासह राज्यातील गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार, १५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यात जळगाव महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका गेल्या ५ ते ७ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
तीन कोटींहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क..
या महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरातून सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपलेली असून, त्यासोबतच जालना आणि इचलकरंजी या दोन नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांच्याही निवडणुका होणार आहेत. महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून, राजकीय हालचालींना जोर येण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम..
इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत सादर करता येतील. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी असून, त्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.







