जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव येथे होणाऱ्या बहिणाबाई सोपानदेव चौधरी १९ व्या खान्देशस्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि अर्पण सेवा ट्रस्टच्या वतीने मंगळवार, १७ जून रोजी महात्मा गांधी उद्यानात एक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. ज्येष्ठ साहित्यिक विजय लुल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत प्रामुख्याने पर्यावरण, युवकांसाठी व्यसनमुक्ती मार्गदर्शन, चर्चासत्र आणि कवी संमेलन यांसारख्या विषयांवर चर्चा करून त्यांचे नियोजन निश्चित करण्यात आले. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध नियोजन समित्यांच्या नियुक्तीबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली. अध्यक्ष विजय लुल्हे यांनी संमेलन अधिक दर्जेदार आणि यशस्वी कसे होईल, याबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री पुष्पा साळवे, किशोर नेवे, कवी डॉ. संजय पाटील, डॉ. विलास नारखेडे, लीलाधर नारखेडे, ज्येष्ठ साहित्यिक निंबा बडगुजर, संतोष सोनार, हरीश सोनार, रघुनाथ राणे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नेवे यांनी केले, तर पवन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास नारखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.