अमळनेर, (प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे दाखल पोस्कोच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीने बसस्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहमदाबाद येथील सौरभ शर्मा याने गेल्या पाच ते सहा दिवसापासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम.पी. या नावाने खोली भाड्याने घेतली होती. दररोज तो ११ वाजता उठवायला सांगायचा. मात्र सोमवारी १२ रोजी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते की, मला उशिरा उठवा. दुसऱ्या दिवशी दिनांक १३ मे रोजी दुपारी हॉटेलचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही व दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरवाजा तोडून आत डोकावले असता करणसिंगने चादर फाडून छताच्या कडीला गळफास घेतलेले दिसले. पोलिसांनी त्याला खाली उतरवून अधिक माहिती घेतली असता त्याचे नाव सौरभ शर्मा असून तो अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. त्याने मृत्यूपूर्वी आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून “मी ऑपरेशन मौत जवळ पोहचलो आहे” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी त्याच्या डायरीत त्याला फसवलेल्या मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा उल्लेख केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याच्याजवळील मोबाईल, डायरी व इतर साहित्य फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.