नाशिक, (प्रतिनिधी) : शहरात एका अनोख्या मेळाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. राज्यभरातून आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो पुरुषांनी “पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा” आयोजित करून आपल्या व्यथा मांडल्या. या मेळाव्यात पत्नींकडून होणाऱ्या छळाच्या अनेक कहाण्या समोर आल्या असून, यातून पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा मेळावा नाशिकमधील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता, जिथे पीडित पुरुषांनी आपल्या अनुभवांसह सरकारकडे कायदेशीर संरक्षणाची मागणी केली.
मेळाव्यात राज्यातील नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह इतर भागांतून शेकडो लोक सहभागी झाले होते. काहींनी आपली ओळख लपवून ठेवली, तर काहींनी थेट आपली नावे आणि अनुभव उघडपणे मांडले. या मेळाव्याचे आयोजन “पुरुष स्वाभिमानी फांऊंडेशन” या संघटनेने केले होते. सहभागी पुरुषांमध्ये नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती होत्या, ज्यांनी पत्नींकडून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याचा दावा केला. मेळाव्यात अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या. एका ४० वर्षीय नोकरदार व्यक्तीने सांगितले, “माझ्यावर पत्नीने खोटे आरोप लावून घरातून हाकलपट्टी केली. मुलांना भेटण्यासाठी मी दोन वर्षांपासून कोर्टाचे उंबरठे झिजवतोय, पण न्याय मिळत नाही.”
दुसऱ्या एका ३५ वर्षीय व्यावसायिकाने सांगितले की, “पत्नीने माझ्यावर खोटा कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला. त्यामुळे माझी नोकरी गेली आणि समाजात मान खाली घालावी लागली.” अशा अनेक कहाण्यांमधून हे स्पष्ट झाले की, कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आणि सामाजिक दबाव यामुळे हे पुरुष हतबल झाले आहेत. या मेळाव्यातून “पुरुष आयोग” स्थापन करण्याची मागणी समोर आली आहे. पुरुषांचे म्हणणे आहे की, महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग असताना पुरुषांच्या समस्यांकडे दुर्लक्ष का? त्यांनी सरकारकडे मागण्या केल्या आहेत की, पुरुषांच्या तक्रारी ऐकून त्यांना संरक्षण देणारी यंत्रणा असावी. पतीविरुद्धच्या तक्रारींचा तपास निःपक्षपातीपणे व्हावा. खोट्या खटल्यांपासून संरक्षणासाठी कायद्यात बदल करावा. यासोबतच पुरुष आयोगाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.