गोंदिया, (वृत्तसेवा) : जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. यात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ ते २० लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस पलटी झाली. अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ती शिवशाही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बसच्या काचा फुटल्या आणि आत बसलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले.
दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत.