जळगाव, (प्रतिनिधी) : कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या नऊ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. निर्मल सीड्सचे डॉ. जे. सी. राजपूत, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नमो बायोप्लांटचे पार्श्व साभद्रा, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, कृषीदूतचे डॉ. रामनाथ जगताप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
शेतकऱ्यांना शेतमजूर ही समस्या सध्या सर्वात जास्त भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनात कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल ४० हून अधिक तर एकूण २०० पेक्षा अधिक स्टॉल्स असतील. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यानच्या या चार दिवसीय तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. क्षारमुक्त पाण्याचा (RO) वापर करून वाढवा शेतीचे उत्पादन, झटका मशीन, सोलर वरील शेतीपंपाचा डेमो यासह शासनाचा कृषी विभाग बँक शेतीविषयक पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध असतील. शहरी शेती अर्थात टेरेस गार्डन तसेच घरगुती बागेसाठी उपयुक्त साधने, किचन-गार्डनिंग टूल्सही या प्रदर्शनात उपलब्ध असतील.
मोफत भाजीपाला बियाणे व आरोग्य तपासणी..
निर्मल सीड्सतर्फे पहिल्याच दिवशी प्रदर्शनास येणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर गोदावरी फाउंडेशनतर्फे पुरुष तसेच महिला शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन स्थळीच प्राथमिक आरोग्य तपासणी चारही दिवस मोफत असेल, असेही आयोजकांनी सांगितले.