जळगाव, दि. ०६ – वाचक हा आपोआप निर्माण होत नसतो तर तो घडवावा लागतो. वाचनाचा संस्कार रुजवणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे आणि हे काम परिवर्तन करीत आहे. परिवर्तन पुस्तक भिशी सारख्या योजना गावागावात निर्माण होण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी ‘परिवर्तन पुस्तक भिशी’च्या कार्यक्रमात मांडले. याप्रसंगी गवस यांनी वाचन, समाज, शिक्षण पद्धती याविषयी परखड मते मांडली.
बोलताना ते पुढे म्हणाले की, मुलांना नोटा ओकणारे मशीन बनवण्याचं काम आपली शिक्षण पद्धती करत असून पुस्तकाचं बोट सक्तीने सोडायला भाग पाडलं आहे. आपल्या जगण्याच्या केंद्र स्थानी पैसा आला व सर्व कला हद्दपार व्हायला लागल्या आहेत. आज अविचारी लोकांची बक्कळ पैदास निर्माण झाली आहे. इतक्या भौतिक सुविधा असूनही माणूस व माणूसपण हवरत चालले आहे. याला कारण पुस्तकापासून आपलं बोट सुटलं आहे, कलेचं बोट सोडलं आहे. वाचनाची पहिली पायरी लहान पुस्तकं व गोष्टींची पुस्तकं आहे त्यातून गंभीर वाचनाकडे जाता येतं. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आमची गाठ पुस्तकांशी घालून दिली होती. आज शिकलेले पालक हे मुलांचं जीवन घडवत नसून बिघडवत आहेत, त्यांना मार्कांमध्ये अडकवत आहेत. मुलांचा जगण्याचा आनंद हरवत असून न वाचणारे लोक शिक्षक होत आहेत ही समस्या निर्माण झाली आहे. कारण संदर्भ ग्रंथ वाचनं ही गोष्टच गाईडच्या सुळसुळाटामुळे हद्दपार झाली आहे. आज गाईडचा जमाना निर्माण झाला आहे याला उत्तर परिवर्तन पुस्तक भिशीच्या निमित्ताने मिळाले आहे.
परिवर्तन वाचक तयार करण्याचे काम करते आहे. कारण वाचक हा तयार करावा लागतो हे मराठी समुह मान्य करत नाही, तो आपोआप तयार होतो असाच चुकीचा समज आहे. संगीत ऐकण्यासाठी जसा कान तयार करावा लागतो ही त्याची प्रक्रिया आहे. चित्र पहाण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, शिल्प समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे मग वाचन समजून घेण्यासाठी प्रशिक्षण नको का ? वाचनाचा विकास करण्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठीची गरज आहे. भिशीची प्रक्रिया ही वाचक निर्माण करणारी आहे, असे मत राजन गवस यांनी मांडले.
कार्यक्रमात प्रा. मनोज पाटील यांनी त्यांच्या वाचनाच्या प्रवासाविषयी व रंगनाथ पठारे यांच्या दिवे गेलेले दिवस या कादंबरीचा परिचय करून दिला. तर मंजुषा भिडे यांनी राजन गवस यांच्या तणकट या कादंबरीचा परिचय करून दिला.
प्रमुख वक्त्यांचा परिचय ज्योती राणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.