धरणगाव, दि.२३ – चोरगाव शिवारात गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झालेले होते. शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात होते. गुरे चारणाऱ्यांना बिबट्याची दहशत झाली होती.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी पिंजरा लावण्यात आला.
परंतु, बिबट्या सतत हुलकावणी देत होता. अखेरीस मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या आव्हाणी येथील नंदू बापू पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बुधवारी सकाळी सहा वाजता आव्हाणी गावकऱ्यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांना माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आव्हाणी येथे धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले.
जळगाव उप वनसंरक्षक विवेक होशिंग, सहा.वनसंरक्षक एस.के.शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एरंडोल दत्तात्रय लोंढे, अनिल साळुंखे वनपाल, एन. एन. क्षीरसागर, उमेश भारुळे, शिवाजी माळी, लखन लोकनकर, कांतीलाल पाटील, योगेश सोनवणे, विवेक देसाई (मानद वन्यजीव रक्षक जळगाव) कारवाई केली. याप्रसंगी यावेळी जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, सरपंच सदाशिव पाटील, रवींद्र पाटील शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.