पाचोरा, प्रतिनिधी : जळगावहून पाचोऱ्याकडे येत असताना कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश प्रल्हाद काळे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. बिल्दी धरणाजवळ २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. काळे यांच्या निधनाने पाचोरा शहरासह परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

स्वामी विंग, रिंग रोड, पाचोरा येथील रहिवासी असलेले काळे हे समर्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आर. के. जिमचे संचालक होते. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काळे हे एमएच १९, ईजी २२११ क्रमांकाच्या कारने जळगावहून पाचोऱ्याकडे येत होते. बिल्दी धरणाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.









