पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला

भडगावातील ए. बी. पेट्रोलियमवरील घटना; दोन संशयित ताब्यात

भडगाव प्रतिनिधी : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील १० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना शहरातील ए. बी. पेट्रोलियम पेट्रोल पंपावर घडली. २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८.५५ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अरुण शेनपडू पाटील (वय ४८, रा. बाळद रोड, एकवीरा नगर, भाग-२, भडगाव) हे संबंधित पेट्रोल पंपावर काम करत होते. रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्याकडे पैशांची विचारणा केली. ‘किती पैसे आहेत?’ असे विचारल्यानंतर पाटील यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यातील एकाने कोयत्याचा धाक दाखवत पाटील यांच्याकडील मोबाइल हिसकावला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर पाटील यांनी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक पेट्रोल पंपावर दाखल झाले. मात्र, तोपर्यंत संबंधित संशयित पसार झाले होते.
याप्रकरणी अरुण पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.








