जळगाव, प्रतिनिधी : ज्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर केला त्यांची शेती फायदेशीरच ठरली आहे. ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनामुळे फक्त जळगावच नाही तर आजूबाजूच्या पाच ते सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध होऊन शेती फायदेशीर ठरण्यात मदतच होते. तेव्हा शेतकऱ्यांनी ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात रविवारी ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी श्री. जैन बोलत होते. आमदार राजू मामा भोळे, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, उद्योजक स्वरूप लुंकड, जितेंद्र कोठारी, निवृत्त कृषी सहसंचालक अनिल भोकरे, ॲग्रीरियनचे प्रशांत पाटील, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कृषी प्रदर्शनाचा समारोप आज सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरी मार्गदर्शनाची गरज असताना ॲग्रोवर्ल्डने भरवलेले हे प्रदर्शन शेतकरी, पशुपालक यांच्याबरोबरच कृषी उद्योजक म्हणून प्रक्रिया उद्योगात सोलर उद्योगात तसेच ॲग्री स्टेटसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना देखील फायदेशीर असल्याचे आमदार राजू मामा भोळे यांनी सांगितले.
प्रदर्शनात ॲग्री स्टार्टअपसह विविध प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देणाऱ्या स्टॉल शेतकऱ्यांनी दिवसभर गर्दी केली होती. याशिवाय फवारणीसाठी ड्रोन, आधुनिक कृषी यंत्रे, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धती, करार शेती, टिश्यूकल्चर केळीबाबत अनेकांनी विचारणा केली. फळे-भाजीपाला रोपवाटिका, सुधारित बियाणे आणि नॅनो फर्टिलायझर, शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, किचन गार्डन टूल्स तसेच परसबाग आणि टेरेस गार्डन याबाबत नागरिकांनी माहिती जाणून घेतली.
ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्कार २७ जणांना प्रदान..
शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी तसेच फार्मर प्रोडूसर कंपनी, महिला बचत गट अशा २७ जणांचा यावेळी ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शेतकऱ्यांची अलोट गर्दी; रविवार ठरला ‘सुपर संडे’..
आधुनिक शेतीची दिशा, बदलते कृषी तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री आणि नावीन्यपूर्ण शेती प्रयोग जाणून घेण्यासाठी रविवारी ॲग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. प्रदर्शनातील २२० हून अधिक स्टॉल्सवर विविध कृषी उत्पादने, आधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी दिवसभर शेतकऱ्यांची वर्दळ सुरू होती. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट देत विविध दालनांची पाहणी केली. सुटीचा दिवस असल्याने प्रदर्शन परिसरात सकाळपासूनच गर्दी वाढत गेली. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांची उपस्थिती यामुळे ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शनाचा रविवार खऱ्या अर्थाने ‘गर्दीचा सुपर संडे’ ठरला.








