जळगाव, प्रतिनिधी : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ५२६ प्रकरणांत कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांविरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध भागांत एकाचवेळी ही मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी रस्त्यांवर वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष
तपासणीदरम्यान मद्यपान करून वाहन चालविण्याची ४९ प्रकरणे समोर आली. यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार इतर नियमभंगाच्या ३५६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. फॅन्सी नंबर प्लेट वापरण्याच्या १५, कलम १९४ बी अंतर्गत ३१, दुचाकीवर तीन जण प्रवास करण्याची चार, वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे एक, कलम ६६/१९२ अंतर्गत आठ आणि हेल्मेट न वापरण्याची ६२ प्रकरणे नोंदविण्यात आली.
वाहतूक नियमभंगाच्या या सर्व ५२६ प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली. त्यातून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
मद्यपान करून वाहन चालविल्याने चालकासह रस्त्यावरील अन्य नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. वेगवेगळ्या प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे वाहन चालविताना नियमांचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच जळगाव, चाळीसगाव आणि भुसावळ शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.








