जळगाव, (प्रतिनिधी) : घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे तसेच सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणात त्याच्यासोबत असलेल्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात विशाल वसंत नेमाडे (वय ३७, पद सहाय्यक अभियंता, वर्ग-२, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जळगाव शहर महसूल व देयक उपविभाग, जळगाव, रा. योगेश्वर नगर, जळगाव), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३, महावितरण, रा. लक्ष्मीनगर, सावखेडा शिवार, कोल्हे हिल्सजवळ, जळगाव) आणि रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३, महावितरण, ह.मु. जळगाव, मूळ रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार हे जळगाव शहरातील ४० वर्षीय रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिन्ही संशयितांनी तक्रारदारांच्या घरी जाऊन नवीन वीज मीटरची तपासणी केली. यावेळी मीटर तसेच घरातील विद्युत उपकरणांचे फोटोही काढण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे याने तक्रारदारांना फोन करून जळगावातील पांडे चौक येथे बोलावून घेतले. तेथे तिन्ही जणांनी घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचा दावा केला. या प्रकरणी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पुढील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारांकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी तत्काळ जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी केली. यावेळी भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी स्वतःसह सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे पांडे चौक परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी भरत तायडे याने तक्रारदारांना लाचेची रक्कम सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार नेमाडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, बाळू मराठे, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.








