जळगाव, प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि निश्चित ध्येय आवश्यक आहे. मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितपणे यश संपादन करता येते, असे प्रतिपादन धुळे येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे नवनियुक्त संशोधन अधिकारी प्रमोद राणेराजपूत यांनी केले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा भाग म्हणून जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय आणि मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमोद राणेराजपूत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचा योग्य वापर कसा करावा, तसेच उपलब्ध शैक्षणिक व व्यावसायिक संधींचा प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अभ्यासात सातत्य ठेवताना अपयशामुळे खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. योग्य दिशा, नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वास या चार बाबींच्या आधारे स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग सुकर होतो, असे राणेराजपूत यांनी सांगितले.
करिअरच्या विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी दिशा मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबतही प्रेरणा मिळाल्याने आत्मविश्वास वाढल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक अजय ठाकूर, गृहपाल निखिल महाजन, सतीश सोनवणे यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थिनी रोशनी चव्हाण हिने केले, तर महेंद्र पाटील यांनी आभार मानले.









