नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

रोटरी क्लबच्या सहकार्याने शहरभर जनजागृती बॅनर; नागरिकांना ऑनलाइन व्यवहारात सतर्क राहण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी : नशामुक्ती, सायबर फसवणूक आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी जळगाव पोलीस आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधणारे जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत.

मोहिमेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, नशेपासून दूर राहण्याचे आवाहन, सायबर फसवणुकीपासून बचाव, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
शहरातील गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅनरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत नशामुक्ती आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑनलाइन व्यवहार वाढत असताना नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक, संदेश किंवा फोन कॉलला प्रतिसाद देताना विशेष खबरदारी घ्यावी, असा संदेशही या मोहिमेतून देण्यात येणार आहे.
जळगाव पोलीस आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे शहरात नशामुक्ती, सायबर सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षेबाबत जनजागृतीला बळ मिळणार आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचे अध्यक्ष रोहित आहुजा, सचिव धनराज कासट, योगेश सांखला, पूनम वर्मा, सुमित डॅनियल, तुषार भामरे, विराज पटेल, तरुण ऐदासनी, सागर वाणी, विनीत हेमनानी, रजत भोळे, प्रकाश मुळे, रितेश छाजेड आणि युवराज परदेशी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला सहकार्य करून नशामुक्ती, सायबर सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.








