जळगाव प्रतिनिधी घरमालक दाम्पत्य नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी गेले असताना मोलकरणीने घरातील कपाटातून ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच बँक लॉकरची चावी चोरून नेल्याची घटना जयनगर भागात रविवारी (ता. २०) घडली. या प्रकरणी गायत्री बापू पाटील (रा. हरिविठ्ठलनगर) हिच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयनगर येथील स्वाती नीलेश झवर या पतीसह रविवारी नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी गेल्या होत्या. त्याच दिवशी धुणीभांडी व साफसफाईच्या कामासाठी गायत्री पाटील त्यांच्या घरी आली होती. दाम्पत्य बाहेर गेलेले असताना तिने कपाटातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन कॉईन, ४ ग्रॅम वजनाचे दोन टॉप्स आणि १ ग्रॅम वजनाच्या नाकातील तीन फुली, असे एकूण ५५ हजार रुपये किमतीचे दागिने तसेच बँक लॉकरची चावी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
स्वाती झवर घरी परतल्यानंतर कपाटातील दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी याबाबत सासूकडे विचारणा केली. त्यावेळी गायत्री पाटील बेडरूममध्ये गेली होती व तिने दरवाजा लोटला होता, अशी माहिती सासूने दिली. त्यानंतर स्वाती झवर यांनी २२ तारखेला रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गायत्री पाटील हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










