जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पिकांवर झालेला परिणाम, सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनाचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ व जामनेर तालुक्यांतील विविध गावांना भेट देत पिकांची पाहणी केली. फेकरी येथे त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कापूस पिकाच्या पहिल्या वेचणीचा पीक कापणी प्रयोगही घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कापसाची वेचणी करून पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया समजून घेतली. प्रयोगातून प्राप्त झालेल्या कापूस उत्पादनाची नोंद सीसीई प्रणालीमध्ये करण्यात आली. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत उत्पादनाची नोंद घेण्यात आली.

यानंतर कुऱ्हापानाचे येथे कापूस, सोयाबीन आणि मका पिकांच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली. यावेळी पिकांची वाढ, सद्यस्थिती तसेच अपेक्षित उत्पादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. चोरवड येथे सोयाबीन व मका पिकांची, तर जामनेर तालुक्यातील महुखेडा येथे मका, सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी करण्यात आली.

उत्पादनाचा वस्तुनिष्ठ अंदाज घेण्यावर भर
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पिकांवर झालेला परिणाम, जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकांची वाढ आणि संभाव्य उत्पादनाची स्थिती याबाबत प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीद्वारे माहिती संकलित केली जात आहे. पीक कापणी प्रयोगातून मिळणारी उत्पादनाची आकडेवारी पीकविमा प्रक्रियेसह आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.









