जळगाव, प्रतिनिधी : ‘पुढे पोलिस अधिकारी उभे आहेत. अंगावर दागिने असल्यास ११ हजार रुपयांचा दंड होईल. त्यामुळे दागिने काढून ठेवा,’ अशी बतावणी करून दोन तोतया पोलिसांनी ७८ वर्षीय व्यावसायिकाकडील सोने-चांदीचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीजवळ घडली. या प्रकारात २० ग्रॅमची सोन्याची चेन, २० ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि २५ ग्रॅमची चांदीची चेन असा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी पृथ्वीराज कुंदलमल जैन (वय ७८, रा. गुजराथी गल्ली) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पृथ्वीराज जैन हे इलेक्ट्रीकल्स वस्तूंचे व्यावसायिक असून मंगळवारी जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते टॉवर चौकाच्या दिशेने जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. ‘आम्ही पोलिस आहोत. रात्रीच्या वेळी चेन ओढण्याच्या चार घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोने-चांदीचे दागिने घालून फिरू नका, असे मोठ्या साहेबांनी आदेश दिले आहेत,’ असे सांगून त्यांनी जैन यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर ‘टॉवर चौकाजवळ साहेब उभे आहेत. दागिने घालून पुढे गेल्यास ११ हजार रुपयांचा दंड होईल,’ असे सांगत दागिने काढून ठेवण्यास जैन यांना प्रवृत्त केले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जैन यांनी २० ग्रॅमची सोन्याची चेन, २० ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि २५ ग्रॅमची चांदीची चेन समोरील व्यक्तीच्या हातातील कागदात ठेवली.

दागिन्यांची पुडी कागदात गुंडाळल्याचे भासवून संबंधित व्यक्तीने ती जैन यांच्या वाहनाच्या डिक्कीत ठेवली. काही अंतर पुढे गेल्यानंतर जैन यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यात दागिने नसल्याचे लक्षात आले. तोपर्यंत दोन्ही भामटे तेथून पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.









