यावल, प्रतिनिधी : तालुक्यातील अंजोळा शिवारातील गट नंबर ५२०/१ मधील शेडमधून अज्ञाताने खिडक्या, दरवाजे आणि इलेक्ट्रिक साहित्यासह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र सिताराम फेगडे (वय ६२, रा. जुना सातारा, सुतार गल्ली, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, १० फेब्रुवारी ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या अंजोळा शिवारातील शेड लक्ष्य केले. चोरट्याने शेडमधून २५,००० रुपये किमतीच्या १८ स्लायडिंगच्या खिडक्या, १०,००० रुपयांचे ४ ॲल्युमिनियमचे दरवाजे आणि ५,००० रुपयांचे १० इलेक्ट्रिक बोर्ड व कॉपरची वायर असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी नरेंद्र फेगडे यांच्या फिर्यादीवरून २५ ऑगस्ट २०२६ रोजी यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










