जळगावच्या श्वान पथकात ‘गुरू’ची एन्ट्री; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई
बॉम्ब शोधक बेल्जियन मालिनॉइस श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण

जळगाव : बॉम्ब शोध आणि सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव पोलीस दलाची क्षमता आणखी वाढली आहे. जळगावच्या श्वान पथकात ‘गुरू’ या प्रशिक्षित बॉम्ब शोधक श्वानाचा समावेश करण्यात आला आहे. बेल्जियन मालिनॉइस जातीच्या गुरूने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

एक वर्ष वयाच्या गुरूने प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करत ४०० पैकी ३७० गुण मिळविले आहेत. बॉम्ब शोधण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या गुरूची आता जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तपासणीसाठी मदत घेतली जाणार आहे.

गुरूसोबत त्याचे हँडलर्स पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी (HC/534) आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश झोपे (HC/1926) यांनीही पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिघांनीही १५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव श्वान पथकात हजेरी लावली.
गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणे तसेच संशयास्पद वस्तूंची तपासणी करताना गुरूची विशेष मदत घेतली जाणार आहे. गणपती उत्सव, विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा तपासणी करताना गुरूची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
गुरूच्या समावेशामुळे जळगाव पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकाला अधिक बळ मिळाले असून, प्रशिक्षित श्वानासोबत अनुभवी हँडलर्सची नियुक्ती झाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.









