जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला आणि जळगाव ते पंढरपूर दरम्यानचे तब्बल ४८५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पार केले.

गुरुवार, दिनांक ९ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता जळगावच्या आकाशवाणी चौकातून या वारीने प्रस्थान केले होते. राष्ट्रगीत आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षणानंतर निघालेला हा ग्रुप शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचला. पंढरपुरात दाखल होताच सर्व सायकलिस्ट सदस्यांनी आपल्या सायकली हवेत उंचावून वारी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. या सायकल वारीमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्यासह ६० पुरुष आणि ८ महिला अशा ६८ मुख्य सदस्यांसह एकूण ७५ जणांनी हा ४८५ किलोमीटरचा खडतर प्रवास तीन दिवसांत पूर्ण केला.
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन..
सायकलवारी पंढरपुरात सुखरूप आणि यशस्वीरीत्या पूर्ण होताच, जळगाव जिल्ह्याचे नेते तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी थेट दूरध्वनीवरून व्हिडिओ कॉलद्वारे महापौर दीपमाला काळे आणि सर्व सायकलिस्ट सदस्यांशी संवाद साधला. वारी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश..
या वारीच्या यशस्वी पूर्ततेनंतर महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांचे आभार मानले. “माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे माझे सलग दुसरे वर्ष आहे. ही केवळ धार्मिक वारी नसून, एक सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणारी चळवळ आहे. सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहतेच, शिवाय इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, हाच संदेश आम्हाला या वारीतून द्यायचा होता,” असे महापौर दीपमाला काळे म्हणाल्या.
विठ्ठलाला साकडे..
“गेल्या १५३ दिवसांत जळगाव शहराची प्रथम नागरिक म्हणून काम करताना मी ‘आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण’ या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. विठ्ठलाच्या चरणी लीन होताना मी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या सुखासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी साकडे घातले आहे. जळगावला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आम्ही जे ‘विकास व्हिजन’ हाती घेतले आहे, त्याला पांडुरंगाने बळ द्यावे हीच प्रार्थना केली,” अशी भावना महापौर काळे यांनी व्यक्त केली.
जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या या यशस्वी उपक्रमाचे आणि विशेषतः महापौरांच्या या जिद्दीचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आणि राजकीय स्तरातून मोठे कौतुक होत आहे.







