हेमंत पाटील | जळगाव, दि.11 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून लग्नसमारंभ मोजक्या पाहुण्यांमध्ये करावे लागत आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जळगावातील अनिल केर्हाळे व पत्नी शारदा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका अगदी अनोख्या पद्धतीने तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलायं.
केर्हाळे यांची कन्या निकिता हिचा विवाह चेतन यांच्याशी पाच फेब्रुवारीला नियोजित असून त्यासाठी तयार करण्यात आलेली लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
लग्नपत्रिकेची रचना कोवीड लसीकरण प्रमाणपत्रा प्रमाणे करण्यात आली असून, यात विवाह सोहळा संबंधीची माहिती, वधू-वरांची नावे याचा उल्लेख तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोवीड संदर्भात जनजागृती करत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लसीकरण प्रमाणपत्रावरील प्रतिमेची मांडणी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ‘तुमचे लसीकरण हाच आमच्यासाठी आहेर’.. असा भावस्पर्शी मजकूर या पत्रिकेत छापला आहे.
या अनोख्या जनजागृतीपर लग्नपत्रिकेमुळे अनिल आणि शारदा केर्हाळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वांनीच दक्ष राहून, लसीकरणासह आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.