जळगाव, (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जळगाव महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना पूर्णपणे ब्रेक लागला आहे. पुढील महिनाभर महापालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या नियंत्रणाखाली राहणार असल्याने राजकीय वर्तुळात ‘प्रशासन राज’ सुरू झाल्याची चर्चा आहे. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीमुळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची अधिकृत वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून, ५ जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या शासकीय रॅलीमध्येही पदाधिकाऱ्यांना सहभागी होता येणार नाही.
या आचारसंहितेचा थेट परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर आणि नियोजित उपक्रमांवर होणार आहे. पुढील आठवड्यात होणारी स्थायी समितीची बैठक स्थगित करण्यात आली असून, महासभाही घेता येणार नाही. यामुळे निधी मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि विविध विभागांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास विलंब होणार असून विकासकामांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिकेच्या खर्चातून नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला नगरसेवकांचा दोन दिवसीय प्रशिक्षण दौराही प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत रद्द केला आहे. २२ मे रोजी सर्व नगरसेवक ई-बसने नाशिकला रवाना होणार होते, मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने हा दौरा रद्द करावा लागला आहे.







