जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी ‘कर्मचारी संवाद व जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उद्या, सोमवार दि. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मनपा सभागृहात पार पडणार आहे.
महानगरपालिकेच्या शहर विकासात कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा असतो. मात्र, अनेकदा कामाचा अतिरिक्त ताण, सोयी-सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. विशेषतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा बोजा टाकणे आणि कामचुकारांना अभय मिळणे, अशा तक्रारी कर्मचारी वर्गातून केल्या जातात. या सर्व समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी हा दरबार भरवण्यात येत आहे.
या उपक्रमात सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाविषयक अडचणी, कामकाजातील समस्या आणि सूचना थेट मांडता येतील. मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तरी सर्व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधींनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







