जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणे शिवारात सोमवारी रात्री ‘मुलं पळवणारी टोळी’ सक्रिय असल्याच्या संशयावरून एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे शिवारात ‘लक्ष्मी जिनिंग’ परिसरात सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर सोनवणे यांच्या ३ वर्षीय चिमुरड्याला पळवून नेत असल्याचा संशय काही स्थानिकांना आला. या संशयाचा वणवा इतक्या वेगाने पसरला की, काही वेळातच तिथे मोठा जमाव जमा झाला. जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना पाचारण न करता संबंधित तरुणावर हल्ला चढवला. संतापलेल्या जमावाने त्याला जमिनीवर लोळवून बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी पोलिसांना कळवले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाल्याने मंगळवारी पहाटे ४:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पाच मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण), प्रशांत उर्फ प्रकाश सोनवणे (रा. बामणोद), अजय उर्फ बादल सोनवणे (रा. बामणोद), अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ) यांचा समावेश आहे.
”नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवून कोणाचा जीव घेणे हा गंभीर गुन्हा आहे.” -जळगाव पोलीस प्रशासन








