जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाने राबविलेले जनजागृती अभियान आणि विविध उपाययोजनांनंतरही जळगावकरांमध्ये मतदानाबाबत पुन्हा एकदा निरुत्साह दिसून आला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला असून शहरात एकूण ५३.५९ टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ५५.७७ टक्के होते, त्या तुलनेत यंदा मतदारांनी मतदानाकडे काहीशी पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळाले.
सकाळचा शुकशुकाट अन् दुपारची गर्दी..
आज सकाळी ७:३० वाजता शहरातील विविध केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. दुपारपर्यंत मतदारांचा प्रतिसाद अत्यंत संथ राहिल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, दुपारी ३:०० वाजेनंतर परिस्थिती बदलली. ऊन कमी होताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि केंद्रांवर अचानक गर्दी वाढली. या गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण आला.
मतदानाची आकडेवारी काय सांगते?
निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात एकूण २,३४,९९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात प्रामुख्याने पुरुष मतदारांनी आघाडी घेतली आहे.
पुरुष मतदार: १,२२,८५८
स्त्री मतदार: १,१२,१३३
इतर: ०५
वेळ संपली तरी रांगा कायम..
मतदानाची अधिकृत वेळ संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या दोन तासांत झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ५:३० वाजेपूर्वी जे मतदार केंद्राच्या आवारात दाखल झाले होते, त्या सर्वांना प्रशासनाकडून टोकन देऊन मतदानाची संधी देण्यात आली. यामुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री ६:३० ते ७:०० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाची आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
निकाल कोणाच्या बाजूने?
मतदानाचा टक्का २ टक्क्यांनी घसरल्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कमी मतदानाचा फटका नक्की कोणाला बसणार आणि फायदा कोणाचा होणार, याबाबतची गणिते आता मांडली जात आहेत. मतदानाचा टक्का घटल्यामुळे निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, संपूर्ण शहराचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.








