जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महानगरपालिकांसह जळगाव महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता शहरात राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. मागील निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखणाऱ्या भाजपने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत युती तुटल्याने वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. ऐनवेळी युती तुटल्यामुळे भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे मित्रपक्ष अनेक ठिकाणी परस्परविरोधात मैदानात उतरले होते. या पार्श्वभूमीवर, जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी भाजपने आधीपासूनच ‘मिशन ७५’ ची तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत भाजपने ७५ पैकी तब्बल ५७ जागांवर दणदणीत विजय मिळवत महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाची रणनीती ठरविण्यात आली आहे. मित्र पक्षांसोबत युती झाली अथवा नाही झाली, तरीही पक्षाने महापालिकेच्या सर्व ७५ जागा स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. पक्षाचे कार्यालय इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने फुलून गेले आहे. उमेदवारीसाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या असून, भाजपकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने केली जात आहे.
युतीत लढल्यास जागा वाटप आणि तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे मोठे आव्हान असेल. दुसरीकडे, युती तुटल्यास तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये होणारी तिरंगी किंवा चौरंगी लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे, या निवडणुकीत भाजप आपले मागील यश कायम राखते की, युतीचे मित्रपक्ष एकत्र येतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जळगाव महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







