जळगाव, (प्रतिनिधी) : शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील आर्थिक वादाच्या चौकशीत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून २०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या निंभोरा पोलीस स्टेशनमधील एका पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, आरोपी हवालदाराने हे पैसे निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली होती. जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता दत्तात्रेय नवघरे यांनी या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांनी एका शेतकऱ्याकडून ₹१,२७,००० किमतीचा केळीचा माल घेऊन दिल्लीतील व्यापाऱ्याला विकला होता, परंतु त्यांनी शेतकऱ्याला त्याचे पैसे दिले नव्हते. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तक्रार अर्ज केल्यानंतर आरोपी पोलीस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराला चौकशीसाठी निंभोरा पोलीस स्टेशनला बोलावले. चौकशीदरम्यान, हवालदार पवार यांनी तक्रार अर्जात नमूद केलेल्या रकमेच्या दहा टक्के लाच रक्कम मागितली, अशी तक्रार तक्रारदाराने दि. ०७/१०/२०२५ रोजी, जळगाव येथे केली.
तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०७/१०/२०२५ रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणीची कार्यवाही करण्यात आली. यावेळी, हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल तक्रार अर्जाच्या चौकशीत गुन्हा नोंद न करण्यासाठी व त्यांना योग्य ती मदत करण्याच्या मोबदल्यात ₹२०,०००/- लाचेची मागणी केली. ही रक्कम निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे आरोपी पोलीस हवालदार सुरेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही.
या सापळा कारवाईचे पर्यवेक्षण ला.प्र.वि. जळगावचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकुर यांनी केले. पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे या सापळा अधिकारी होत्या. सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. किशोर महाजन, म.पो.हे.कॉ. संगीता पवार, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकुर हे करत आहेत.








