भुसावळ, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील शनीपेठ भागातील रहिवासी बबली अरुण ढंढोरे या ५० वर्षीय महिलेने सोमवारी दि. ३० रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समोर आले नाही. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बबली ढंढोरे ही महिला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता तापी नदीच्या पुलावर पोहोचली. नंतर त्यांनी नातेवाईकांना संपर्क करत आत्महत्या करत असल्याचे सांगत काही क्षणात तापी पात्रात उडी घेतली. यावेळी पुलावरून जाणारे माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी महिलेस वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाण्यातील दगडावर आदळल्याने मृत झाली. काही वेळाने महिलेचे नातेवाइक घटनास्थळी आले. कोठारी यांनी पोहणाऱ्यांना बोलवून महिलेचे शव बाहेर काढण्यास मदत केली. शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल भंडारी, उपनिरीक्षक इक्बाल सय्यद यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला.