अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील घटना
अमळनेर, (प्रतिनिधी) : आईने बाजारात सोबत नेले नाही म्हणून १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिळोदे येथे १२ सप्टेंबर ला घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माया सुधाकर कोळी (वय १४, रा. पिळोदे ता. अमळनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे. परिवारासह ती राहते. मायाची आई मालुबाई सुधाकर कोळी या बाजार करण्यासाठी अमळनेर येथे जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी माया ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
ग्रामस्थांच्या मदतीने मायाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.