नवी दिल्ली / जळगाव, दि.३ (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चौपदरी पुर्णत: कॉन्क्रीटचा करावा. त्यानंतर तो शहराच्या संबंधीत यंत्रणेकडे हस्तांतरीत करावा. तसेच या महामार्गावर बांभोरीजवळ गिरणा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करुन सादर करावा ; अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या संबंधित यंत्रणेस दि. २७ ऑगस्टला दिल्यात. नितीन गडकरी यांनी जळगाव येथील मान्यवर नागरिकांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून रस्त्यांचे विविध प्रस्ताव मान्य करण्यासंदर्भात सहमती दर्शविली आहे.
जळगाव येथील नागरिकांचे हे शिष्टमंडळ जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या नेतृत्त्वात नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान अतुल जैन यांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्याशी संपर्क करून शिष्टमंडळ व नितीन गडकरी यांच्यातील झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच खासदार स्मिता वाघ यांची आज नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक असून जळगाव संदर्भातील महामार्गाच्या विविध विषयांवर धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येऊन शहर विकासाच्या विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी जळगाव नागरिक मंच स्थापन केला आहे. या मंचने ज्येष्ठ पत्रकार तथा एनएचईपीचे संचालक उदय निरगूडकर यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या प्रत्यक्ष भेटी संदर्भात विनंती केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील महामार्गाशी संबंधीत समस्यांचे सविस्तर टिपण अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात तयार करून उदय निरगुडकर यांच्याकडे पाठविले होते. त्यांच्या मध्यस्थीने नितीन गडकरींची भेटीची वेळ निश्चित झाली. या अनुषंगाने अतुल जैन यांनी जळगावच्या शिष्टमंडळासह दि.२७ ऑगस्टला नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
जळगावच्या शिष्टमंडळात क्रेडाई संघटनेच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष अनिष शहा, उद्योजक प्रेम कोगटा, दीपक चौधरी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सुशील नवाल, पत्रकार दिलीप तिवारी यांचा समावेश होता. अतुल जैन यांच्यासह शिष्टमंडळातील इतरांनी नितीन गडकरी यांना जळगाव शहरातील महामार्गाची सध्याची दुरावस्था, त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, वाढलेल्या अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या जळगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली.
महामार्ग चौपदरीकरणाचे सध्यस्तिथीतील रेंगाळलेले काम धुळे, पाळधी, तरसोद या ठिकाणी थांबलेले वळण महामार्गाचे काम, तसेच गिरणा नदीवरील प्रस्तावित पुलाचे न सुरू झालेले बांधकाम या विषयी वस्तुस्थिती दर्शक माहिती दिली. अतुल जैन यांनी नितीन गडकरी यांना आग्रह केला की, ‘जळगाव शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटकरण करताना ते थेट पाळधी बायपास ते तरसोद बायपास असे शहरातून करावे. हे काम करताना बांभोरी जवळ गिरणा नदीवर नवा पूलाचे बांधकाम करावे.’ यावर नितीन गडकरी ही म्हणाले की, ‘जळगावची ही गंभीर समस्या मला माहिती आहे त्यामुळे शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटीकरण नक्कीच करु तसेच नव्या पुलाच्या बांधकामासाठी कार्यवाही करु.’ हे सांगत असतानाच नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईल वर कॉल करुन योग्य त्या सूचना दिल्यात.
नितीन गडकरी यांच्या सोबत झालेल्या चर्चेपुर्वी जळगावच्या शिष्टमंडळाशी त्यांचे स्वीयसहाय्यक अमोल बिराजदार-पाटील यांनी जळगावच्या महामार्ग विषयक समस्यांबाबत सविस्तर चर्चा करुन तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सविस्तर टीपण तयार करून नितीन गडकरी यांना माहिती दिली होती, त्यामुळेच गडकरींनी जळगावच्या प्रश्नांवर मुद्देसुद कार्यवाहीच्या तातडीने सूचना दिल्या.
शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांच्यासमोर मांडलेले मुद्दे…
मांडलेला मुद्दा १ :
धुळे ते तरसोद बायपासचे काम रेंगाळले आहे. त्यावरील धुळे, पाळधी आणि तरसोदजवळील वळण महामार्गाचे काम थांबलेले आहे. जर वळण महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास जळगाव शहरातील वाहतुकीचे अनेक प्रश्न सुटतील.
मांडलेला मुद्दा २ :
जळगाव शहरातील महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून अपघातांची संख्या वाढून त्यात मनुष्यहानी होत आहे. या महामार्गाचा विस्तार करुन त्याची उंची वाढवून दोन्ही बाजूस एलईडी पथदीप लावावेत, मोठ्या आकारातील गटारीचे बांधकाम करावे.
मांडलेला मुद्दा ३ :
पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडॉर मंजूर झालेला आहे. या प्रकल्पात जळगावाचा समावेश करावा. त्याचे कार्यक्षेत्र जळगावपर्यंत वाढवावे. तसे केल्यास जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय तसेच शेतीमाल व प्रक्रिया उत्पादन थेट इतर जिल्ह्यात व राज्यात पोहोचविणे शक्य होईल. जळगाव परिसरातील पर्यटन, हॉटेल, खासगी वाहतुक सेवा, दळणवळण सेवा वाढीस प्रोत्साहन मिळेल. भुसावळ येथील रेल्वेचा ड्रायपोर्ट आणि जळगाव विमानतळातील विस्तारणाऱ्या सुविधा यामुळे लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या संधी वाढतील.
वरील सर्व मुद्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळास सांगितले की, ‘जळगावच्या मागण्यांविषयी मी स्वतः सहमत आहे. जळगाव जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय, लघुउद्योग शेतमाल आणि प्रक्रिया माल वाहतुकीसाठी ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉर नक्कीच उपयुक्त ठरु शकेल. महामार्गाशी संबंधित शहरातील मार्गाचे चौपदरी क्रॉन्क्रीटीकरण तसेच बांभोरी जवळचा पुल नव्याने बांधणे यावर लगेच प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देत आहे. वळण रस्त्यांची कामे लवकर करण्यासाठी संबंधित विभागास आदेश देत आहे.’ चर्चेनंतर शिष्टमंडळातील अतुल जैन यांनी जळगावकर नागरिकांच्या वतीने आभार मानले.
आज खासदार स्मिता वाघ यांच्याशी चर्चा..
जळगाव शहरात महामार्गावर या आठवड्यात दोन महिला आणि एका वृद्धाचा बळी गेल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांना नागरिकांच्या रोषाला सामोरा जावे लागले आहे. त्यांच्यावर टिकाही होत असून मोर्चे काढले आहेत. या विषयी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी खासदार स्मिता वाघ यांना दिल्लीत नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच जळगाव शहरातील महानगराशी संबंधित विषयांबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. दरम्यान खासदार स्मिता वाघ या आज दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.