जळगाव | दि. ०५ ऑगस्ट २०२४ | निसर्ग कवी ना.धों. महानोरांना प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरांनी व सुरांनी आदरांजली अर्पण करण्यात आली. निसर्गाशी महानोरांची कविता नातं सांगणारी होती. त्याला अनुसरूनच जळगावात काल धो धो पाऊस होता, एवढ्या पावसातही रसिकांची तुडूंब गर्दी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होती.
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन जळगावतर्फे ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या वारकरी व संत परंपरेचा शोध घेणा-या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरवातील महानोराच्या आठवणी व कवितांचे सादरीकरण करण्यात आले. नंतर महानोरांची कविता ज्या वारकरी परंपरेच्या वाटेनं गेली त्या परंपरेवर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण परिवर्तनच्या कलावंतानी केले.
याप्रसंगी पद्मश्री कवी महानोर यांच्या प्रतिमेला जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नलाखे, दत्ता बाळसराफ, माजी महापौर जयश्री महाजन, रमेशदादा जैन, रविंद्र पाटील, एरंडोलच्या तहसिलदार सुचिता चव्हाण, नहीचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, बाळासाहेब महानोर, उद्योजक अनिश शहा, मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर या मान्यवरांनी पुष्प अर्पण केले.
याप्रसंगी अशोक जैन यांनी मनोगतात महानोर दादांच्या आठवणी सांगत दरवर्षी पुण्यतिथीला जळगावात दादांच्या स्मृतींना वंदन करणारा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. सभागृहातील सर्व रसिकांनी दोन मिनीटे मौन पाळून महानोरांना श्रद्धांजली अर्पण केली. “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” यात संत ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखोबा , नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरोबा कुंभार, सावता माळी , सोयराबाई , कान्होपात्रा, एकनाथ, तुकाराम या संतकवींच्या रचनांचे सादरीकरण करण्यात आले. निवेदन जेष्ट रंगकर्मी शंभू पाटील यांनी आपल्या अनोख्या प्रासादिक शैलीत केले.
परिवर्तन निर्मित कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची, दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे होते, निर्मिती प्रमुख विनोद पाटील व मंगेश कुलकर्णी, संगीत संयोजन सुदिप्ता सरकार व मंजुषा भिडे यांचे होते. रंगमंचावर नितीन सोनवणे व यशवंत गरुड यांची चित्र लक्ष वेधून घेत होती .या कार्यक्रमात गोविंद मोकाशी, भूषण गुरव, अंजली धुमाळ, रजनी पवार, वरुण नेवे, अनुषा महाजन , विकास वाघ यांनी विविध अभंगांचे सादरीकरण केले. मानसी जोशी, डॉ. सोनाली महाजन, आराधना पाटील, शशिकांत महानोर यांनी अभंगांचे अभिवाचन केले. संवादिनीवर गोविंद मोकाशी, पखवाज वादन भूषण गुरव, तबल्यावर साथसंगत राहुल कासार, बासरीवर योगेश पाटील, तालवाद्य शिवचरण गाठे हे कलावंत सहभागी झाले होते.