जळगाव | दि. ०२ ऑगस्ट २०२४ | भुसावळ रेल्वे हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रकांत आनंदा मराठे (वय ५६, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये कक्ष सेवक म्हणून कर्तव्य बजावत होते. दरम्यान गुरुवारी दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेला कर्तव्य संपल्यावर ते जळगाव येथे घरी जाण्यासाठी निघाले असताना आसोदा ते भादली दरम्यान रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाले.
सकाळी साडेनऊ वाजता स्टेशनचे कर्मचारी सागर भिडे व त्यांचे सहकारी आसोदा ते भादली दरम्यान खांबा क्रमांक ४२७/२४ ते २६ दरम्यान घटनास्थळी पोहोचले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.