आ. राजूमामा भोळे यांचे सुनील महाजन यांना आव्हान
जळगाव | दि.२९ जुलै २०२४ | आमदार सुरेश भोळे यांच्यावर टक्केवारी घेण्याचे आरोप महापालिका माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केले आहेत. ‘सुनील महाजनांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत, त्याच दिवशी राजकारण सोडून देईल’, मात्र, सुनिल महाजन यांचे मनपाच्या १५ व्या मजल्यावर काय उद्योग चालतात हे सर्वांना माहित आहेत, असा पलटवार आ. सुरेश भोळे यांनी रविवारी सायंकाळी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आमदार भोळे यांच्यावर टक्केवारीसह विविध आरोप केले होते. आमदारांच्या टक्केवारीच्या गणिताने जळगावचा विकास रखडला असून संपूर्ण महामार्ग खड्डेमय झालाय. रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. त्यासाठी आमदार निधी आणतात मात्र त्यातून त्यांनी २ कोटी रुपयांचे कमिशन घेतले आहे, असा खळबळजनक आरोप सुनील महाजन यांनी केला होता. या आरोपानंतर आ. भोळे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दोन कोटी रुपये घेतल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. सुनील महाजन यांनी सदर आरोप सिद्ध करून दाखवावे असे आव्हान दिले आहे. पत्रकार परिषदेत विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महेश जोशी, मनोज भांडारकर उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला ६१ हजार मतांचा लीड जळगाव शहरातून मिळाला असून त्यांच्या प्रभागात व त्यांच्या बुथवर देखील भाजपला लीड मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना चांगले झापले आहे, त्यामुळे हा पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. म्हणून ते अशा पध्दतीने डर्टी राजकारण करत आहेत त्यांनी विकासाच्या बाबतीत स्पर्धा करावी, असेही आ. भोळे यांनी सांगितले.
डॉ. सुनील महाजन यांच्या अध्यापक विद्यालयाचे कामदेखील मी करून दिले आहे. कोणीही असो, असे जनतेचे कामे आम्ही सतत करीत असतो. शहानिशा केल्याशिवाय भूमिका मांडू नये. लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. शासकीय विश्रामगृहात कोणी ठेकेदारांच्या बैठका घेतल्या, ठेकेदारांना कोणी धमकावले, निरंजन नावाच्या त्यांच्या नातेवाईकाने ब्रिटीश कालिन पाईपलाईनचे भंगार विकून खाल्ले, मेहरूण तलावातून पाण्याची चोरी त्यांच्या या नातेवाईकाकडून केली जात असून मेहरूण तलावातून त्याने पाईपलाईन केली असल्याचा खळबळजनक आरोप आ. भोळे यांनी केला आहे.