जळगाव, दि.१८ – निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी स्वीप या उपक्रमात समाजातील सर्व घटक, संस्था, संघटना, प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण जळगाव जिल्ह्यात मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढवू शकलो आहे. त्यामुळे हे यश कोणा एकट्याचे नसून सांघिक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते समाजकल्याण भवनात आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
स्वीप या उपक्रमात सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच संघटना व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार तसेच स्विप उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये पात्र झालेल्या व्यक्ती तसेच संस्थाचा सत्कार कार्यक्रम समजकल्याण भवन येथे शुक्रवार दि.१७ मे रोजी आयोजित करण्यात आला होता.
या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, महानगर पालिकेच्या आयुक्त पल्लवी भागवत, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.डी.लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगतात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, मी या निम्मिताने सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपण जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदान टक्केवारी वाढविण्यात विशेष कामगिरी करू शकलो आहोत. आज खरे म्हणजे भाषणात जास्त बोलण्याची गरज नाही आपण जे केले आहे ते सर्वासमोर आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांची दखल निवडणूक आयोगाने घेतली ही आपल्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.
स्वीप या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधे प्रावीण्य मिळविलेल्या स्पर्धकाना या वेळी बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्या प्रतिनिधीना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे सह. आयुक्त योगेश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.