जळगाव, दि.१९ – समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार, तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरीबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी, एक कोटी घरांना मोफत सौरवीज, विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगांस प्रोत्साहन, शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसाह्य अशा विविध योजनांतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गँरंटी आहे, असा दावा प्रदेश भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
सुमारे सहा दशके देशावर सत्ता गाजवूनही काँग्रेसने देशातील गरीबी हटविली नाही. उलट दारिद्र्यरेषा गडद होत गेली. तरुणांना रोजगाराच्याच नव्हे, तर शिक्षणाच्या संधीदेखील नाकारल्या गेल्या, संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अपमान केला, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची उपेक्षा केली, महिलांच्या उत्कर्षाच्या संधी नाकारल्या, आणि उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून देश गरीब व मागासलेला राहील याचीच दक्षता घेत जगासमोर हात पसरण्याचे धोरण पत्करून जनतेलाही दुर्ब मानसिकतेत ठेवले. याउलट गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या आणि विकासकेंद्री नेतृत्वामुळे, काँग्रेसने निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीचा मार्ग सापडला असून २०४७ पर्यंत जगातील सर्वात समृद्ध देश म्हणून भारत ताठ मानेने जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास मोदी यांनी दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे संकल्पपत्र म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असून प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे हा आपला संकल्प असल्याची पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे, असेही उपाध्ये म्हणाले.
या संकल्पपत्रातील प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने अथक परिश्रम करणार असून समाजातील शेवटच्या स्तरावरील व्यक्तीपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचा पक्षाचा निर्धार आहे, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.महिला शक्ती,युवा शक्ती,शेतकरी आणि गरीब या चारच जाती देशात आहेत, असे माननीय पंतप्रधान मानतात. या समाजघटकांना अधिक सक्षम करून देशाला समृद्ध करण्याची मोदी यांची गॅरंटी आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसचा जाहीरनामा हे अपयशाचे प्रतिबिंब आहे,असे ते म्हणाले. काँग्रेसने याआधी जाहीरनाम्यातून दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही अशी टीकाही त्यांनी केली. भाजपच्या संकल्प पत्रातील प्रत्येक मुद्दा ही रोजगारनिर्मितीची ग्वाही असून भाजपचा संपूर्ण जाहीरनामा रोजगारनिर्मितीला समर्पित आहे, असे निःसंदिग्ध प्रतिपादनही त्यांनी केले.
भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची भाजपा जाहिरनामा बाबत महत्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आली होती. या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जिल्हा महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा सरचिटणीस अमित भाटिया, अरविंद देशमुख, महेश जोशी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, जितेंद्र पाटील, मुविकोराज कोल्हे, सोशल मीडिया प्रमुख धीरज वर्मा उपस्थित होते.