जळगाव, दि.०५ – आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी यांनी केले. जैन हिल्स येथे आयोजित आगम वाचना शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या औपचारिक उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथे होणारे हे सहावे शिबीर असून यात चारशेहून अधिक श्रावक-श्राविका सहभागी झाले आहेत.
जैन हिल्स येथील आकाश प्रांगण, ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ सकाळी झाला. सर्वात आधी सेवार्थी चोरडिया-जैन परिवाराच्यावतीने अशोक जैन यांनी ‘ठाणांग सूत्र’ ग्रंथ आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी यांच्याकडे सुपुर्त करून अर्पण केला. ते वाचन करण्याची विनंती केली. कार्यक्रम स्थळी या ग्रंथाची स्थापना झाली.
भवरलाल आणि कांताबाई जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य सेवादास दलुभाऊ जैन, अशोक जैन, अभंग अजित जैन आणि अजय ललवाणी, स्वरुप लुंकड यांच्याहस्ते मंगलदीप प्रज्ज्वलन करण्यात येऊन याच वेळी आगम पोथीचेही विमोचन करण्यात आले. जैन हिल्स येथील आयोजिलेले हे सहावे आगम वाचना शिबीर आहे.
जैन हिल्स येथे हे शिबीर आयोजनामागची भूमिका अशोक जैन यांनी आपल्या भाषणातून श्रावक-श्राविकांपुढे मांडली. उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. गायक सुजल शाह यांनी भक्तीगीते सादर केली. कार्यक्रम संपन्नतेसाठी संजय गांधी, देवांग दोशी, किरण जैन, अमित कोठारी आदींनी परिश्रम घेतले.
आगम वाचना प्रवेशात आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी ‘ठाणांग सूत्र’ मध्ये सांगितलेल्या १० सुखांबाबत सांगितले. यातील पहिले सुख हे ‘आरोग्य’ आणि दहावे सुख हे ‘मोक्ष’ सांगण्यात आले आहे. तीन दिवसांच्य वाचनात सकाळी ९ ते १२ आणि तद् नंतर गौराई प्रसादालयात सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रात वाचन आणि त्याचे निरुपण समजावून सांगण्यात येत आहे. जैन हिल्स येथील निसर्गरम्य स्थळी शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आली आहे.