जळगाव, दि.०३ – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा शुक्रवारी आय.एम.आर महाविद्यालयाच्या सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केसीईचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, केसीई व्यवस्थापन समिती सदस्य ॲड.प्रविणचंद्र जंगले, नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, नाट्य परिषद स्पर्धा समन्वयक दिलीप दळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यात एकांकिका स्पर्धेत उत्कर्ष कलाविष्कार भुसावळची ‘अस्तित्वाची खिचडी’ ही एकांकिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. एकांकिका स्पर्धेत वैयक्तिक अभिनयाच्या प्रमाणपत्रांमध्ये गणेश सोनार, संजय निकुंभ (भृगूसंहितेची पाने), उमेश गोरधे, जयश्री पुणतांबेकर, प्रेरणा देशमुख (अस्तित्वाची खिचडी), लोकेश मोरे, सोनल शिरतुरे (कंदील), हर्षल पाटील, रचना अहिरराव (सेकंड हॅण्ड), किरणकुमार अडकमोल, प्रितीश पाटील (चांदणी) यांना प्रदान करण्यात आली. एकांकिका स्पर्धांसाठी डॉ.अनिल बांदिवडेकर (मुंबई) व विलास पागार (पालघर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
बालनाट्य स्पर्धेत प्रथम नाट्यरंग जळगावच्या ‘म्हावरा गावलाय गो’ तर द्वितीय पारितोषिक ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, जळगावच्या ‘हलगीसम्राट’ यांना जाहीर झाले असून, बालनाट्य स्पर्धेत वैयक्तिक अभिनयाच्या प्रमाणपत्रांमध्ये मुलांमध्ये श्लोक गवळी (म्हावरा गावलाय गो), प्रणित जाधव, अथर्व पाटील (हलगीसम्राट), दामोदर धनंजय चौधरी (जय हो फॅण्टसी), मनीष भरत जाधव (विद्या विनयेन शोभते) तर मुलींमध्ये शर्वा जोशी (म्हावरा गावलाय गो), आदिती पराग कोलते, मानवी अरविंद पाटील (जय हो फॅण्टसी), हर्षदा माळी (अन्नपुर्णा), रिया बाळू पाटील (विळखा) या बालनाट्यातील बालकलावंतांना प्रदान करण्यात आली. बालनाट्य स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून ज्योती निसळ (मुंबई) व आसावरी शेट्ये (रत्नागिरी) यांनी काम पाहिले.
या महोत्सवामधील नाट्यछटा स्पर्धेत प्रथम केतकी राजेश कोरे (बोलकी), द्वितीय इप्सिता आबा वाघ (प्रदुषण) तर उत्तेजनार्थ वेदांत पंकज बागुल (पिंट्या) यांना प्रदान करण्यात आले. नाट्यअभिवाचन स्पर्धेत प्रथम मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय यांना ब्रेन या नाट्यवाचनासाठी तर संजय निकुंभ वॉरियर्स यांना शिवशाहीच्या अज्ञात बेटावर या नाट्यवाचनासाठी द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या दोन्ही स्पर्धांसाठी ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान व प्रा.राजेंद्र देशमुख यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. कमी प्रवेशिकांमुळे एकपात्री स्पर्धेचा निकाल नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेतून एकत्रित जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत प्रथम शशिकांत नागरे (धुळे), द्वितीय पूजा घोडके (नाशिक), तृतीय सृष्टी कुलकर्णी (जळगाव), उत्तेजनार्थ हर्षदीप अहिरराव (नाशिक) यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.पद्मनाभ देशपांडे यांनी मानले. नाट्यजागर कलेचा या स्पर्धा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ, कार्यवाह पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, सदस्य सुबोध सराफ, प्रा.प्रसाद देसाई, हेमंत पाटील, वैभव मावळे, हर्षल पवार, दिनेश माळी आदींनी परिश्रम घेतलेत.