जळगाव, दि.१६ – “येणारा काळ स्पर्धेचा काळ असणार आहे, या काळासाठी स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा” असे प्रतिपादन नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक स्पर्धा परीक्षांचे लेखक कपिल पवार यांनी केले. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा महाशिबिरात ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर गौराई कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी.आर.चौधरी, वाकोद येथील पोलीस पाटील संतोष मुठे, स्पर्धा परीक्षा तज्ञ जयदीप पाटील, बन्सीलाल हस्तीमल जैन महाविद्यालयाच्या प्राचार्या रूपाली वाघ, विनोदसिंग राजपूत, राणीदानजी जैन विद्यालयाचे प्राचार्य आर.सी.चौधरी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की, “वाकोद येथे उभारलेली अभ्यासिका आणि ग्रंथालय हे तरुणांचे भविष्य निर्माण करणारे देवालय आहेत. अशोक जैन यांनी दूरदृष्टी राखून या केंद्राचे निर्माण केले आहे. यातून भविष्यात अनेक अधिकारी निर्माण होतील. अधिकारी म्हणून करिअर घडवितांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जा. सर्व विषयांचा सखोल अभ्यास करा. दररोज वृत्तपत्र वाचन करा. स्वतःच्या अभ्यासाचे परिपूर्ण नियोजन करून ते अमलात आणण्यासाठी सर्वस्व झोकुन असेही ते म्हणाले.
याप्रसंगी वाकोद येथे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या नितीन पाटील व गणेश पवार यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर. चौधरी, रूपाली वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व अर्चना चौधरी यांनी मानले.