जळगाव, दि.११ – परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे जेष्ठ वास्तूविशारद शिरीष बर्वे यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्र विषयात कार्य करणारे शिरीष बर्वे हे उत्तम वास्तू विशारद म्हणून ओळखले जातात. त्यांना यापूर्वी यंग आर्किटेक्ट ऑफ एशिया या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे.
आजवरच्या त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेतील उपक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आलं. कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या आयोजन प्रसंगी मध्यंतरात ज्येष्ठ अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या हस्ते शिरीष बर्वे आणि माधुरी बर्वे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, अनिल कांकरिया, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, अनिश शहा, नहीचे अधिकारी शिवाजी पवार, डॉ. शेखर रायसोनी, मनोहर पाटील, रोहित निकम या मान्यवरांसोबत अभिनेते पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव आणि मयुरा रानडे हे उपस्थित होते. मानपत्राचे वाचन हर्षल पाटील यांनी केले.