जळगाव दि.०७ – नादातून या नाद निर्मितो…श्रीराम जय राम या संकल्पनेवर आधारित बालगंधर्व महोत्सवात संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरेल मैफल व युगल गायनासह दुर्मिळ सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. साधरे मन सूर को साधरे..’ गीतासह एकाहून सरस बंदिशींच्या सादरीकरणामुळे रसिक श्रोते आनंदित झाले.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची आज सांगता झाली.२३ वा बालगंधर्व दि.३, ४, ५ जानेवारी २०२५ दरम्यान होईल अशी घोषणा दीपक चांदोरकर यांनी केली. गुरूवंदना अथर्व मुंडले यांनी सादर केली. सुत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले. आभार वरूण देशपांडे यांनी मानले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे व्हाईस प्रेसिटेंड प्रर्सोलनचे चंद्रकांत नाईक, मेजर नानावाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, जितेंद्र भावसार, उल्हास कुलकर्णी यांनी कलावंतांचे तर दीपिका चांदोरकर यांनी दिप्ती भागवत यांचे स्वागत केले.
अभिजात संगीतातील युगल गायन हा तसा अवघड व दुर्मिळ प्रकार. याप्रकारात पं. रितेश व रजनीश मिश्रा बंधुंनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची सुरवात राग मारूबिहाग ने केली. बड्या ख्याल विलंबित एकतालात निबध्द होतात ‘पैया तोरी लागे’ बोल सादर केले. छोटा ख्याल रात के असते पियरवा सादर केले. “मै दीनू राम जननी, राम लखन सिया वन को” हे भजन सादर केले. सुरसंगम चित्रपटातील ‘साधरे मन सूर को साधरे..’ गीत प्रस्तुत करून रसिकांना स्वरसाधनेची अनुभूती दिली. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, अभिनय रवंदे, तानपु-यावर वरूण नेवे, मयूर पाटील यांनी संगत केली.
संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरेल मैफल..
पं. आदित्य ओक व निनाद मुळावकर यांच्या संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरवात पं. आदित्यने राग मारवाने केली. बडा ख्याल ताल रुपक मध्ये निबध्द होता. त्यानंतर छोटा त्रितालात होता. निनाद यांनी पहाडी धून वाजवून रसिकांची वाहवाह मिळवली. त्यानंतर संगीत मानअपमान नाटकातील “झाले युवती मना” हे नाट्यपद आदित्य ओक यांनी दमदारपणे सादर केले. नंतर निनाद मुळावकराने फ्लूट मेडले मोगरा फुलला, तू ही रे, मोह मोह के धागे सादर करून रसिकांची मने जिंकली. बडे गुलाम अली खान यांनी अजअमार केलेली ‘याद पिया की आये’ या ठुमरी ने श्रोत्यांना परमानंद दिऊन गेले. गुलाम अली यांचि सुप्रसिद्ध गज़ल – चुपके चुपके आणि हंगामा हे बरपा आदित्य ने ताकदीने सादर केले. दोघांनी कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ही पंडीत जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत केलेल्या भैरवीने बालगंधर्वाची सुरेल सांगता झाली. त्यांना तबल्यावर साथ प्रख्यात तबलावादक विनायक नेटके व कीबोर्डवर विशाल धुमाळ यांनी संगत केली.