जळगाव, दि.३० – अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ करत स्पर्धेत आपली छाप उमटवली. मुलांच्या गटात तामिळनाडूच्या जैदंबरीश ने २००० मानांकन असलेल्या तेलंगणाच्या विघ्नेशला ७२ चालीपर्यंत झुंज दिली. तर महाराष्ट्र संघातील रायगडचा पारस भोईरने तेलंगणाच्या कँडीडेट मास्टर शैक सुमेरला सुरवातीपासूनच गोंधळात टाकत खळबळजनक निकालाची नोंद केली.
दिवसअखेर अंतिम वृत्त हाती आले तेव्हा मुलांच्या गटात इम्रान, अर्शप्रीत सिंह व पारस भोईर यांनी ४ गुणांसह आघाडी घेतली असून ९ खेळाडू साडे तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय क्रमांकावर आहेत. मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून धक्कादायक निकाल चौथ्या फेरीत मुलींच्या गटात आठव्या क्रमांकावरील पटावर त्रिपुराच्या आर्शिया दासने संहिता पूनगावनमचा अवघ्या २२ चालितच धुव्वा उडवला. तर सुरवी भट्टाचार्य व मोदीपल्ली दीपशिखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या गटात देखील धक्कादायक निकालांची परंपरा चालू ठेवली आहे. चौथ्या फेरिअखेर संनिध्दी भट आणि आंध्रा ची आमुक्ता गुंटाका ४ गुणांसह आघाडीवर असून शूभी गुप्ता, अनुपमा श्रीकुमार, जागृती कुमारी, सपर्या घोष व शेराली पट्टनाईक साडे तीन गुणांसह द्वितीय स्थानांवर आहेत.
▪️निसर्गरम्य वातावरण पालकांना भावले…
बुद्धिबळ स्पर्धेतील स्पर्धकांना व पालकांना अनुभूती निवासी स्कूलचे निसर्गरम्य वातावरण भावलेले दिसून आले. याबाबत काही पालकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. अनुभूती निवासी स्कूलचा परिसर मोहित करून टाकणारा आहे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीचे आयोजन, त्यांनी पुरवलेल्या सुविधा व निसर्गरम्य वातावरण आम्हा पालकांसह मुलांसाठीही आरोग्यदायी आहे. मनाला शांती मिळण्यास व आजूबाजूच्या हिरवळीने सर्व थकवा निघण्यास विशेष मदत होते असे बंगळुरू चे कृष्णप्रसाद यांनी सांगितले.