जळगाव, दि. ११ – धरणासाठी जमीन अधिग्रहित केली असतांना शेतातून जास्तीचा मोबदला मिळविण्यासाठी आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील शेत गट नंबर ८ मधील शेती हे भागपूर मातीच्या धरणासाठी आरक्षीत असतानाही शेतात अंब्याची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी शासनाचे कर्मचारी हेमंत मुरलीधर गीरी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
यात नेहा जितेंद्र अग्रवाल, जितेंद्र हनुमानदास अग्रवाल, निधी निखील पसारी, अनिता अनुप अग्रवाल हे सर्व जळगावातील रहिवाशी असून त्यांच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलायं. यासंदर्भात पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अलियार खान करीत आहे.