जळगाव, दि.१० – जळगाव शहरातील महापालिकेच्या १६ व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महापालिका व गाळेधारक असे दोघांचेही हित जोपासण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांनी पत्रकाद्वारे कळविले. गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून व्यापाऱ्यांना आता दिलासा मिळाला असल्याचे देखील आ. भोळे यांनी सांगितले.
मुदत संपलेल्या महानगरपालिकेच्या गाळेधारकांसाठी शासनाने आठ टक्के दर निश्चित केला होता. त्यास राज्यभरातून व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. सुधारित महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मालमत्ता भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण व भाडेपट्ट्याचे नुतनीकरण) नियम, २०२३ मध्ये निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक या सर्व प्रयोजनांकरिता दि. १३ सप्टेंबर २०१९ रोजी निर्गमित अधिसूचनेद्वारे निश्चित भाडेपट्टा दरापूर्वी जो दर संबंधीत महानगरपालिकांमध्ये प्रचलित होता, त्या भाडेपट्टा दरामध्ये दुप्पट प्रमाणापर्यंत आवश्यकतेनुसार भाडेपट्टा दरामध्ये वाढ करण्यात यावी. सदर दर निश्चिती आयुक्त, महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली गठीत “भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समिती” द्वारे निश्चित करण्यात यावी, अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महापालिकेचे नुकसान देखील होणार नसून गाळेधारकांनाही दिलासा मिळेल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले असल्याचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी सांगितले.
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील गाळे धारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्थावर मालमत्तेचे भाडे पट्याद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्याचे नुतनीकरन करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
VIDEO 👇