जळगाव, दि.१४ – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचा जळगावचा ७० वा वर्धापन दिन हा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने जळगाव शहरातील अॅम्बुलन्स चालकांना हायजेनिक कीट, पल्स ऑक्सिमीटर, मॅन्युअल व्हेन्टीलेटर, हॅन्डवॉश, सॅनिटायजर, इत्यादी साहित्य असलेले आरोग्य कीट भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी आजपर्यंतचा रेडक्रॉसच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद, कर्मचारी, स्वयंसेवक आणि शुभचिंतक यांचे मोलाचे सहकार्य मिळत असून भविष्यात अनेक सेवा देण्याचा प्रयत्न करीत राहू असे आश्वासन दिले.
रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि, रेडक्रॉस आणि उपस्थित सर्वच सामाजिक संस्था यांचे उद्दिष्ट एकच असून सर्व मानवतेच्या भूमिकेतून कार्य करीत आहोत. जळगाव जिल्ह्यासाठी सर्व मिळून काम करावे तसेच रेडक्रॉसकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल हेल्थ व्हॅन आणि मोबाईल टेस्टिंग व्हॅनचा उपयोग करीत ग्रामीण भागात गरजू नागरिकांना हि आरोग्य सेवा द्यावी असे आवाहन केले.
नवनियुक्त आयएमए अध्यक्ष आणि प्रसिध्द ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. सुनील नाहाटा यांनी रेडक्रॉस मार्फत सुरु असलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी भविष्यात रेडक्रॉस मार्फत सुरु करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत सर्व सेवाभावी संस्थांनी नॅट टेस्टेड रक्तघटकाचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन करून सर्व मिळून सेवा देण्याचा संकल्प करूया असे मनोगत व्यक्त केले.
तसेच रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांनी गेल्या दोन महिन्यात रोटरी महारक्तदान अभियान राबवून ११७१ रक्तसंकलन केल्याबद्दल माजी अध्यक्ष सुनील सुखवानी, सेक्रेटरी विवेक काबरा आणि प्रकल्पप्रमुख महेश सोनी यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांचे नवनियुक्त अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, रक्तकेंद्र सचिव डॉ.अपर्णा मकासरे, कार्यकारिणी सदस्य पुष्पा भंडारी, शांता वाणी, धनंजय जकातदार व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले.