फराज अहमद | जामनेर, दि.२४ – नशिराबाद येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना घडलीये. दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलाला मात्र किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला अपघातात मृत्यू झाल्याची नोंद करण्याचे काम सुरु होते.
शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर) हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह सामरोद येथे कुटुंबासह राहतात. शनिवारी २४ जून रोजी सकाळी आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी ते आले होते. तेथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते परतत असताना काही वेळांनंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र यांना नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू यांचा मृत्यू झाला तर मुलगा रुद्र याला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.
दरम्यान, मयत कोळी परिवाराच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.