जळगाव, दि.०१ – पोटामध्ये असलेल्या मोठ्या गोळ्यामुळे जीवन जगणे मुश्किल झालेल्या एका महिलेला जिवंतपणे होत असलेल्या त्रासातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागातील वैद्यकीय पथकाने गुंतागुंतीचे ऑपरेशन करून मुक्त केले व महिलेला दिलासा दिला. सदर महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
जामनेर तालुक्यातील गोद्री येथील दीपाली गोपाळ यांचेवर लहानपणी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरापासून तिच्या पोटामध्ये सारखे दुखत होते. नंतर पोटामध्ये गोळा असल्याचे निदान झाले होते व दिपाली गोपाळ हिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांच्यासह कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याची अपेक्षा सोडून दिली होती.
दिपाली गोपाळ या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय जळगाव या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. तपासणीनंतर त्यांच्या पोटातील गाठ ही आतड्याची गाठ असल्याचे निदान झाले. शल्यचिकित्सा विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रिया केल्यानंतर दिपाली गोपाळ हिच्या पोटातून साडेसात किलोचा गोळा काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया वैद्यकीय पथकाने यशस्वी केली. वर्षभरापासून गाठ असल्यामुळे शरीरातील इतर अवयव दाबले गेले होते. सोबतच हृदयाचे दुर्धर आजाराची आधीच शस्त्रक्रिया झालेली असल्याने कमी वेळेत आणि कमीत कमी रक्तस्त्राव होईल अशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया करायची होती, ती यशस्वी झाली.
शस्त्रक्रिया करण्याकामी शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. ईश्वरी गारसे, डॉ. विपिन खडसे, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. जिया उल हक यांच्यासह भुल शास्त्र विभागाचे डॉ. संदीप पाटील, डॉ. ऋतुराज काकड, इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्या पथकाने परिश्रम घेतले. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी शल्यचिकित्सा विभागाचे कौतुक केले आहे.