जामनेर, दि.२०- शहरातील प्रमुख चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास यावर्षी ३५० वर्षें पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या साठी एक प्रेरणादायी जीवन चरित्र असल्याने कित्येक वर्षांपासून जामनेर शहरात महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी शिवभक्तांची मागणी आहे.
पुतळ्याचे काम लवकरात-लवकर सुरू करण्यात यावे. अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ पुतळा उभारणीचे काम हाती घेतल्या शिवाय स्वस्त बसणार नाही.असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिला.
याप्रसंगी युवक अध्यक्ष -अशोक पाटील, तालुका उपाध्यक्ष-विनोद पाटील, नवल पाटील, भगवान खराटे, दशरथ पाटील, भूषण कानळजे, प्रदीप काकडे, संदीप शेळके, दिपक पाटील, रमेश पाटील, बाळू पाटील, भगवान जाधव आदींसह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.