जळगाव दि.१४ – जैन हिल्सवरील आयोजित परिसंवादामध्ये उद्योग आणि संशोधन याची चांगली सांगड कांदा व लसूण परिषदेत घातली आहे. यामुळे कांदा व लसूण पिकांना मोठी चालना मिळेल. यांत्रिककरणाबाबत साधक बाधक चर्चा झाली ही परिषद शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बदल करणारी ठरेल असे मत अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी व्यक्त केले.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन करण्यात आले. या चर्चासत्राचा आज समारोप झाला. शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर विविध पैलू लक्षात घेवून आपले पेपर सादरीकरण व मौखिक सादरीकरण केले. यावेळी डॉ. व्यंकट मायंदे बोलत होते.
परिषदेच्या सकाळ सत्रात जैन इरिगेशनचे डॉ. डी .एन. कुलकर्णी यांनी कांदा व लसूण प्रक्रिया उद्योगाबाबत पेपर सादरीकरण केले. ते म्हणाले, कांदा व लसूण पिकात प्रक्रिया करण्यासंबंधी सकारात्मक काम सुरू आहे. हे काम अनेक भागात यशाने सुरू आहे. जैन उद्योग समूहाने यासंबंधी शेतकऱ्यांशी करार करून कांदा लागवडीसंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. कांदा खरेदी व त्यावर प्रक्रिया केली जाते. मूल्यवर्धनामुळे कांदा शेतीला आधार मिळाला आहे. पांढरा कांदा करार शेती यशस्वी झाली असून, त्याचे चांगले परिणाम दिसतात. या करार शेतीसंबंधी बियाणे पुरवठा, पीक संरक्षण, निविष्ठा याबाबत त्यांनी माहिती दिली.
तसेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी ‘कांदा व लसूण पिकाची काढणी, हाताळणी आणि प्रक्रिया व त्याची साठवणूक याबाबतच्या तंत्रज्ञानावर चर्चा या परिसंवादात होत आहे. शेतकरी, शास्त्रज्ञांसाठी हा परीसंवाद निश्चित मार्गदर्शक ठरत आहे, ‘असे मत व्यक्त केले.
जैन फार्मफ्रेश फूड ली. चे सुनील गुप्ता म्हणाले, कांदा प्रक्रिया, निर्जलीकरण प्रक्रियेत प्रतवारी, स्वच्छता आदी मुद्दे महत्त्वाचे आहे. यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. जैन व्हॅली येथील कांदा प्रक्रिया केंद्रात सर्व गुणवत्ता व इतर बाबींबाबत कटाक्ष आहे. कारण गुणवत्तापूर्ण कच्चा माल असायला हवा. तसेच त्यावर प्रक्रिया करीत असतानाही स्वच्छता व इतर बाबींची काळजी घेतली जाते, असेही सुनील गुप्ता म्हणाले.
समारोपाच्या दुपारच्या तांत्रिक सत्रात व्यापार, आरोग्य आणि सामाजिक समस्या यावर चर्चा करण्यात आली. या सत्राचे अध्यक्ष जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, सह-अध्यक्ष के. बी. पाटील, आसीएआर- डीओजीआर पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राजीव बी. काळे, डॉ. जे. एच. कदम आणि डॉ.सतीशकुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
कांदा आणि लसूणचा प्रभाव अभ्यासातुन शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासात सुधारणा यावर डॉ. राजीव बी. काळे सादरीकरण केले. डॉ. अनिल ढाके यांनी पांढरा कांदा प्रक्रियेसाठी वापरला जातो. चांगल्या गुणवत्तेचा जाती विकसीत करून हक्काची हमी भावाची शेती करार शेतीच्या माध्यमातून जैन इरिगेशनने सुरू केली. यातुन उत्पादन वाढुन शेतकरी विश्वासु पुरवठादार झाला आहे असे सांगितले. देशांतर्गत व्यापार आणि निर्यातीची सद्यस्थिती, ईशान्य भारतात कांदा वर्गीय पिकांचा घटता वापर,कांदा पिकातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा प्रभाव, मूल्यसाखळीसाठी भौगोलिक मानांकन यासह विविध विषयांवर चर्चासत्र झाले.
कांदा व लसूण पिकातील परिषदेत असे झाले ठराव..
कांदा व लसूण विकास परिषदेच्या समारोप चर्चासत्रात व्यासपीठावर इंडियन सोसायटी ऑफ एलम्सचे अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. विजय महाजन, डॉ. सतीश कुमार, डॉ. ए. थंगासामी, डॉ. व्ही. करूपैया आदी उपस्थित होते. कांदा व लसूण चर्चासत्रातून विविध ठराव करित संशोधनाच्यादृष्टीने शिफारसी करण्यात आल्यात. यामध्ये आधुनिक सिंचन, खत व्यवस्थापन तंत्रासह नवे वाण, सुधारित वाणांचा विकास याबाबत कार्यवाही करणार, जास्त किंवा अधिक विद्राव्य घनपदार्थ असलेल्या जातींचा वापर प्रक्रिया उद्योगात आवश्यक आहे. त्यासंबंधीची कांदा जात किंवा वाण विकसित करण्यात येईल, कांदा दरांची स्थिरता येण्यासाठी खरिपातील उत्पादन वाढीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले, जैविक रोग व किडनियंत्रण आणि अजैविक ताण व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणार असल्याचा निर्धार, कांदा साठवणुकीसाठी आधुनिक साठवण गृह उभारून काढणी नंतर होणारे नुकसान कमी करण्यात येणार, कांदा पिकात प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन उद्योजक, शेतकरी उत्पादक गटांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यांत्रिकरण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद गतीने करण्यासाठी निर्णयक्षम यंत्रणा मोबाईल अॅपद्ारे केली आहे, तिचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहिर करण्यात आले. जैन करार शेतीचे कांदा पिकातील मॉडेल शेतकऱ्यांना लाभदायी ठरत असून, त्या मॉडेलचा प्रसार करण्याची गरज असून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठी भर देण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली.