जळगाव, दि.०७ – डाक विभागातील सर्व डाक कार्यालयात ‘सुकन्या समृद्धी योजना खाते’ उघडण्यासाठी दिनांक ०९ व १० फेब्रुवरी या दोन दिवशी विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत सोमवारी जय मंगलाबाई कुलकर्णी प्राथमिक कन्या शाळेत डाक विभागातर्फे आ. सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थिती पालक व मुलींसाठी सुकन्या मेळावा घेण्यात आला. यावेळी डाक अधीक्षक बी. व्ही. चव्हाण, सहायक डाक अधीक्षक एम एस जगदाळे, सहाय्यक अधीक्षक मुख्यालय एस एस म्हस्के, पोस्टमास्टर एस एम कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात बोलतांना आमदार भोळे यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश दिला. तसेच गरीब कुटुंबातील १० वर्षाच्या आतील एकूण १०१ मुलींचे सुकन्या खाते आमदार भोळे यांनी स्वखर्चाने उघडून या मोहिमेचा शुभारंभ केला.
गरीब कुटुंबातील १०१ मुलीचे स्वखर्चाने खाते उघडून आमदार भोळे यांनी गरीब मुलींच्या भविष्यातील शिक्षणाची सोय केली. तसेच मुलीचे सुकन्या खाते काढून प्रत्येक पालकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले. यावेळी गरीब कुटुंबातील मुली व पालक उपस्थित होते.